‘भारतीय संविधानाची प्रास्ताविका: धम्म विचार’

मा. इ. झेड. खोब्रागडे,

आय. ए. एस. (सेवानिवृत्त).

9923756900

भारत हा विविध धर्म, जाती, परंपरा, चालीरीती, प्रदेश, आणि भाषा अशी विविधता असलेला देश आहे. विविधता असली तरी भारत एकसंघ आहे. त्याचे महत्वाचे कारण भारताचे संविधान आहे. भारतीय संविधानाने सर्वांना एका सुत्रात बांधून ठेवले आहे. भारताचे संविधान हा जगातील सर्वात सुंदर असा राष्ट्रग्रंथ आहे. द्वितीय महायुध्द 1945 ला समाप्त झाल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचार विनिमयासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले.  हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघ्न मार्ग, पध्दती, प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळाला ‘कॅबिनेट मिशन’ असे संबोधण्यात आले होते. या कॅबिनेट मिशनने दि. 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची योजना घोषणा केली. भारताचा भावी राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे या योजनेत सुचित करण्यात आले होते.

भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक दि. 9 डिसेंबर 1946 ला नवी दिल्ली येथील ‘संविधान सभागृहात’ भरली नी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीस प्रारंभ झाला. संविधान सभेत दि. 10 डिसेंबर 1946 ला पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी ध्येय आणि उद्दिष्टांचा प्रस्ताव मांडला. संविधान निर्मितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. 29 ऑगष्ट 1947 रोजी अविरोध निवड झाली. मसुदा समितीची पहिली बैठक दि. 30 ऑगष्ट 1947 रोजी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन भारताचे संविधान 2 वर्षे 11 महिने व 17 दिवसात तयार करून या देशाला बहाल केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही भारताच्या लोकांनी भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस; सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना याचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण केले.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये मौलीक तत्वांचा उल्लेख केला आहे. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या महान तत्वांचा जन्म मूलत: भारत भूमीतच झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ”माझे सामाजिक तत्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दात गुंफले जाण्याचा संभव आहे. हे तीन शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तथापी हे माझे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतलेले आहे, असे कोणी समजू नये. माझे गुरू बुध्द यांच्या शिकवणीपासून ते मी घेतले आहे. ही महान तत्वे अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान बुध्दाने सांगितली व भारत भूमीत रूजविली होती. हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये समतेला अतिशय महत्व दिलेले आहे.  समता ही प्रत्येक स्त्री आणि पुरूषांमध्ये असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा व्यक्ती असेल त्याला सुध्दा समतेचा अधिकार असायला पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानात कलम 15 मध्ये लिहिलेले आहे की, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण या आधारावर कोणताही भेदाभेद करण्यास बंदी आहे. कलम 16 नुसार नोकऱ्यांमध्ये समान संधी असायला पाहिजे. कलम 14 नुसार सर्वच नागरिक कायद्यापुढे समान आहेत. बाबासाहेबांनी हे मौलीक तत्व बौध्द तत्वज्ञानातून घेतले आहे. भारतीय इतिहासामध्ये प्राचीन काळामध्ये जातिव्यवस्थेचे खंडन, असमानतेचे खंडन, लिंगाच्या आधारावर भेदाभेदाचे खंडन जर सर्वात आधी कुणी केले असेल तर ते भगवान बुध्दाने केले आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे शतकानूशतके जोपासण्यात आलेली जी अमानवी जाती-वर्ण-वंश-वर्णव्यवस्था होती तिला नाकारल्याशिवाय मानवी मनामध्ये समतेची भावना, प्रेरणा निर्माण होऊ शकत नाही व ही प्रेरणा निर्माण करण्याचे काम बौध्द तत्वज्ञानाशिवाय दुसरे कोणतेही तत्वज्ञान करू शकत नाही. म्हणून आधुनिक काळामध्ये बाबासाहेबांनी बौध्द तत्वज्ञानाचा स्वीकार करून भारताची राज्यघटना निर्माण केलेली आहे. या घटनेमुळेच समाजात प्रत्येक व्यक्तीला समता प्राप्त झालेली आहे, त्यांना आपले अधिकार प्राप्त झालेले आहे.

भगवान बुध्दाने मानवी स्वातंत्र्याचा विचार मांडलेला आहे.  बुध्द धम्माची समतेची प्रेरणा घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा, स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय किंवा धंदा चालविण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 25]26]27 व 28 मध्ये विचार, अभिव्यक्ती, श्रध्दा, पूजा या संबंधीचे व्यक्तीचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेले आहे. बाबासाहेबांनी कलम 19 निर्माण करण्याची प्रेरणा भगवान बुध्दाने जो भिक्खू संघ निर्माण केलेला होता त्यातून घेतलेली आहे. भगवान बुध्दाने भिक्खूंचा वेगळा संघ निर्माण केलेला होता व तो समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्रपणे संचार करीत होता. भगवान बुध्दाने भिक्खूंना म्हटले की, ‘चरिथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय अत्थाय हिताय, सुखाय देव मनुस्सानं….’. भिक्खूंनो जनकल्याणाच्या हितासाठी तुम्ही ठिकठिकाणी जावे.  भिक्खू व भिक्खूणी हे समाजात फिरून बौध्द धम्माचा उपदेश देत समाजातील लोकांना अंधश्रध्देतून, रूढी परंपरेतून मुक्त करण्याचे काम करीत. समाजातील लोकांना विज्ञानवादी दृष्टीने, बुध्दीवादी दृष्टीने विचार करण्यास सांगत. ते कर्मकांडातून, अंधश्रध्देतून, थोतांडातून जे लोक मानसिकरित्या गुलाम झालेले आहेत त्यांना जागृत करण्याचे काम करीत. या भिक्खूसंघाने केवळ भारतातच नव्हे तर विदेशामध्येसुध्दा धम्माचा प्रचार-प्रसार केला.  ज्या-ज्या काळामध्ये बौध्द राजे होते त्यांनी आपले राज्य बौध्द धम्मानुसारच चालविले व प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य दिले.  बाबासाहेबांनी कलम 51 व 301 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधी, व्यवहारासंबंधी, न्याय व शांतता, सुरक्षा राखण्यासाठी कायदा निर्माण करून व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. भगवान बुध्दाने स्त्री आणि पुरूषांमध्ये कुठलाही भेद मानला नाही. पुरूषाप्रमाणे स्त्रीलासुध्दा स्वतंत्र मानलेले आहे. स्त्रीला सुध्दा व्यक्तीगत जीवन जगण्याचा, स्वत:चा विकास करण्याचा अधिकार दिलेला आहे.

भगवान बुध्दाने मानवी मूल्यांची जोपासना करीत असतांना मनुष्याच्या जीवनात बंधुता, मैत्री, अंहिसा किती महत्वाची आहे हे प्रतिपादन केलेले आहे. भगवान बुध्दाने वैदिक यज्ञात पशु-पक्ष्यांचा बळी देऊन जी हिंसा केली जात होती त्याचा विरोध केलेला आहे. बुध्दाने केवळ मनुष्य जीवांचाच विचार केला नाही तर त्यांनी जीव-प्राण्यांचा सुध्दा विचार केलेला आहे.  त्यांच्याबद्दल करूणाभाव, दयाभाव, मैत्रीभाव ठेवावा असे म्हटलेले आहे.  भगवान बुध्द म्हणतात, सर्वच जीव-प्राणी शिक्षेला घाबरतात, सर्वांना आपले जीवन प्रिय आहे. म्हणून सर्वांना आपल्यासारखे समजून दुसऱ्याला मारू नये व मारावयास लावू नये. भगवान बुध्दाचा हा अंहिसावादी विचार प्राचीन काळी जेवढा प्रांसगिक होता तेवढाच आजही प्रासंगिक आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्वाची संकल्पना बुध्द धम्मातून घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकेत अंतर्भूत केलेले आहे. संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकारांची यादी बघितल्यास हे स्पष्ट होते की त्यामध्ये बंधुत्वाची बीजे आहेत. मातृभाव, बंधुभाव, मैत्रीभाव सक्षम असणाऱ्या तत्वांचा मुलभूत अधिकारांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

बौध्द धम्मात न्याय व्यवस्थेला अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. बौध्द काळात न्याय व्यवस्था ही लोकशाही पध्दतीवर आधारित होती. कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी प्रत्येक राजा घेत असे. चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या अपराधानुसारच शिक्षा दिली जात होती. भगवान बुध्दाने बुध्दवचनात म्हटले आहे की, कुणाही निरपराध व्यक्तीवर अन्याय होता कामा नये.  जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्याला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. सम्राट अशोकाने सन्यांशी, गृहस्थ, राव, रंक, निराधार, व वृध्द लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. कुटूंबाना आर्थिक सहाय्य केले. कैद्याना न्याय दिला. बुध्द तत्वज्ञानाचे न्यायाचे विचार बाबासाहेबांनी संविधानात मांडले. संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 22 मध्ये एखाद्या नागरिकाला अटक झाली असेल तर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयापुढे हजर केले पाहिजे. माणसाच्या मुलभूत अधिकारावर घाला घालण्यात आला तर कलम 32 प्रमाणे न्यायालयात दाद मागण्याचा व मूलभूत हक्क बजावण्याचा उपाय सांगीतला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी तो अनिर्बंध अधिकार नव्हे हे ही स्पष्ट केले आहे. कलम 46 अन्वये दुर्बलेत्तर जनवर्गाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक हितसंवर्धन करून त्यांची सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्ती करण्याची जवाबदारी सरकारवर सोपविण्यात आली. हे संपूर्ण तत्वज्ञान बाबासाहेबांनी धम्माच्या विचारातून घेतले आहे.

संविधानात मानवतावादी दृष्टीला अतिशय महत्व देण्यात आले आहे. संविधानाचा मुख्य उद्देश नवीन समाजरचनेत आहे. या समाजरचनेच्या निर्मितीसाठी मानवाचे मानवाप्रतीचे प्रेम आवश्यक आहे. संविधानाच्या समाजव्यवस्था व राजनैतिक व्यवस्थेचे मुख्य लक्ष्य मानवाचे उत्थान करण्याचे आहे. संपूर्ण भारतातील नागरिकांमध्ये समानता, समन्वय, व सहकार्याची भावना निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. संविधानातील मानवतावाद हा बुध्दाच्या निरिश्वरवादाचा पुरस्कर्ता आहे. तथागत भगवान बुध्दाने समाजवादाचा पुरस्कार केला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या भिक्खू संघात देखील समाजवादाची तत्वे होती. भिक्खूंना खाजगी संपत्ती ठेवण्याची मनाई होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भिक्खू संघाच्या रचनेत समाजवादी तत्वे होती.  भारतीय समाजात प्रत्येक क्षेत्रात विषमता आहे.  आर्थिक जीवनात तर प्रचंड विषमतेची दरी आहे. ही बाब लक्षात घेऊन बाबासाहेबांनी संविधानात समाजवादी तत्वांचा समावेश केला आहे.

बाबासाहेबांनी या देशाला दिलेले संविधान महान आहे. त्यास जगात तोड नाही. तथागत भगवान बुध्दांच्या तत्वप्रणालीतून साकारलेल्या संविधानाबद्दल अलिकडे जन-सामान्यात संभ्रम निर्माण करण्याचा, जाणीवपूर्वक समांतर कार्यक्रम चालविण्याचा, लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. भारतात संविधान विरोधी मानसिकता असणाऱ्या संघठना व प्रवृत्ती शांतपणे काम करीत आहेत. त्यांचा संविधानविरोधी अजेन्डा ठरलेला आहे. तो राबविण्याची त्यांच्याकडे सक्षम यंत्रणा आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संविधानात्मक सरंक्षण प्राप्त झालेला समाजातील अधिकारी, बुध्दीजीवी वर्ग संघटीत झाल्यास, मनावर घेतल्यास व मनापासून काम केल्यास समाजाचे विविध प्रश्न, आव्हाने, सोबतच बदलत्या परिस्थितीत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व सांस्कृतिक विषयाच्या संदर्भात समाजातील वंचित-उपेक्षित, गरिब व गरजुंना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी व त्याच्या निराकरणासाठी प्रभावीपणे कृती करू शकतो. अनेक प्रकारच्या शोषणाविरूध्द, अन्याय-अत्याचारा विरूध्द समाजातील या वर्गाने संघर्ष करण्याची नितांत आवश्यकता आहे.

बाबासाहेबांच्या संविधानातील आरक्षण, संरक्षण व विकासात्मक तरतुदींच्या माध्यमातून लाभान्वित झालेल्या या सर्व घटकांचे सोशल ऑडीट करणेही तेवढेच गरजेचे आहे. ”किती सनदी अधिकारी नियमितपणे गावांना भेटी देतात? किती गावातल्या दलित-आदिवासी वस्त्यांमध्ये जातात? किती लोकांशी संपर्क करतात?  कोणते प्रश्न, समस्या पुढे येतात? किती समस्यांचे जाणीवपूर्वक निराकरण करून त्यांना धीर व आधार देतात? समाजाशी त्यांची वर्तणूक कशी आहे? त्यांचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन लोकांनी करणे म्हणजेच सोशल ऑडिट होय. संविधानाच्या कलम 51 क मधील मूलभूत कर्तव्ये आपणास नागरिक म्हणून जवाबदारीची जाणीव करून देणारी आहेतच. ज्यांचेकडे अधिकार आहेत त्यांनी संविधानिक कर्तव्ये चोखपणे व निष्ठेने बजावले पाहिजे. कर्तव्याशिवाय अधिकारास महत्व नाही. अधिकार असलेल्यांकडे शहाणपण सुध्दा असायला पाहिजे. तरच समानतेचे व न्यायाचे राज्य प्रस्थापित होऊ शकते. शतकानूशतकाच्या विषमतावादी संस्कृतीला मुठमाती देण्यासाठी संविधानाच्या संस्कृतीचा स्विकार व त्यानुसार आचरण केल्यावरच देश विकसीत होऊ शकतो. ”आठवण संविधानाची जागर समतेचा” असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे म्हणजे हा देश संविधानाच्या प्रास्ताविकेत नमुद मौलिक तत्वांनुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून प्रत्यक्षात साकारेल. ”कर्तव्य करू, अधिकार मिळवू आणि समतेवर आधारीत समृध्द व सशक्त देश घडवू” हाच भारतीयांचा सम्यक संकल्प असला पाहीजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*