जगभरात सामाजिक सुधारणा आणि लढ्यांचे महत्व काय आहे? या सामाजिक लढ्याचे अविज्ञानवादी, रूढी, परंपरा, जात-पात आणि धर्माचा पगडा असलेल्या देशामध्ये त्याचे महत्व काय? असे अनेक प्रश्न आपणास समोर उद्भवत असतील. सदर सामाजिक लढ्याने भारतासारख्या देशात स्वातंत्र्यानंतर कोणत्या प्रकारचे अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. तर त्यात प्रामुख्याने नमूद करायचेच झाले तर 1949 नंतर देशात भारतीय संविधान लागू करण्यात आले. आणि याद्वारे समता स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांचा स्वीकार करून सर्वांना एका सामाजिक ऐक्याच्या बाकावर आणण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. सर्व विश्वातील ही एक आमुलाग्र सामाजिक क्रांती मानल्या जाते.
परंतु आज कायदा आणि सुव्यवस्थेचे संवैधानिक राज्य असतानाही असामाजिक तत्वांकडून वेळोवेळी भारतीय समाजातील अल्पसंख्यांक समुदायांना समाजाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहातून वेगळे करण्याचे प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्यांच्या सोबत सामाजिक भेदाभेद होतांना पाहायला मिळतो. मग तो इंदर कुमार मेघवाल यांच्या संदर्भात असो किंवा बिलकिस बानो.
बिलकिस बानो
विशिष्ट सामाजिक विषमतावादी विचारधारेने बिलकिस बानो यांच्यावर जे अन्याय केलेत. यावर देशातील न्याय अजूनही अनुत्तरित आहे. एकीकडे देशात ‘भारतीय स्वातंत्र्याचा 75’ वा महोत्सवात सुरू असतांना. बिलकीस बानो प्रकरणातील सर्व आरोपींना सोडण्यात आले. एवढेच नाही तर विषमतावादी ठेकेदारांनी त्या आरोपींचा सत्कार सुध्दा केला. यावरून हेच निदर्शनास येते की आपली मानसिकता किती विकोपास गेली आहे. बानो प्रकरणामुळे समस्त देश हळहळला आणि हे सुरू असतांनाच देशात दुसरी घटना घडली ती म्हणजे इंदर कुमार मेघवाल यांची.
इंद्रकुमार मेघवाल यांच्या बाबतीत बोलायचे झालेच तर, सूराणा (सायला जालोर) गावातील सरस्वती शाळेत तो शिक्षण घेत होता. दिनांक 20 जुलै 2022 रोज बुधवारला एका असामाजिक मानसिकतेने ग्रसित शिक्षकाने त्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला माठामधून पाणी पिण्याच्या कारणावरून मारहाण केली. इतके की त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले, शेवटी 23 दिवस मृत्युशी झुंज देत अखेर 13 ऑगष्ट 2022 रोज शनिवारला त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही विषयांना न्याय मिळावा म्हणून दिनांक 2 सप्टेंबर 2022 ला सविंधान चौक नागपूर येथे, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेकडून निषेध करण्यात आला.