डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद…

Dr. B R Ambedkar

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद…

प्रा. डाॅ. अनिल नितनवरे
आंबेडकरी विचारवंत.

                                     विसाव्या शतकातील भारतीय लोकव्यवहाराला विलक्षण प्रभावित करणारे एक प्रमुख व्यक्तित्व म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. प्रकांड पांडित्य, निरलस ज्ञाननिष्ठा, समनिष्ट चिंतनदृष्टी आणि व्यापक राष्ट्रहिताची तळमळ ही डाॅ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची वैषिष्ट्य होत. तसेच त्यांच्या विवेकगंभीर व्यक्तित्वाला भारतीय समाजव्यवस्थेचे मूल्यभान आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचे मनोज्ञ अधिष्ठानही लाभले होते. गोलमेज परिषदांमधील, संविधाननिर्मितीमधील आणि हिंदू संहितेविषयीच्या त्यांच्या अपर्यायी कर्तुत्वातून सतेच त्यांच्या एकूणच जीवनघडणीतून त्यांच्या अनन्य राष्ट्रनिष्ठेची प्रखरता प्रकट झाली आहे. परंतु भारतीय समाजमनातील तत्कालीन व समकालीन अपसमजांमुळे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा ‘विवेकनिष्ठ राष्ट्रवाद’ हा महनीय विषेष बराच काळ अज्ञात अन् दुर्लक्षित राहिला आहे.

राष्ट्रवाद: एक संकल्पना –
‘राष्ट्र’ या शब्दासाठी प्रचलित ‘नेषन’ (Nation) ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘नेषिओ’ (Natio) पासून आली आहे. ‘नेषिओ’ चा मूळ अर्थ वंष किंवा जन्म असा होतो. उत्तपत्तिषास्त्रानुसार ‘राष्ट्र’ चा अर्थ वांषिक किंवा रक्तसंबंधामुळे एकात्म झालेला समाजसमूह असा होता. काही विचारवंतांनी राष्ट्रनिर्मिसाठी भाषा, वंष, धर्म, संस्कृती या घटकांच्या समानतेवर भर दिला. तर काही विचारवंतांनी समान विचार व भावना असणाऱ्या लोकसमूहातून राष्ट्रनिर्मिती होते असे मानले. तसेच प्रो. झिरमन यांनी राष्ट्र किंवा राष्ट्रवाद या संकल्पना पूर्णतः मानसिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवाद ही मानवी सामाजाची समूहभावन सामाजिक, मानसिक अन् विकसनषील स्वरूपाची भावना आहे. समाजातील वैचारिक-भावनिक ऐक्यातून राष्ट्रनिष्ठा उदयास येते. सामान्यतः फे्रच राज्यक्रांतीपासून जगभर विविध राष्ट्रवादी तत्वज्ञाने निर्माण झालीत असे मानले जाते.

भारतीय राष्ट्रवाद:
सामान्यतः ब्रिटीष राजवटीत भारतीय राष्ट्रवादाची बीज आढळतात. ब्रिटिषांच्या साम्राज्यवादी शोषणयंत्रणेच्या विरोधात आपण सर्व प्रजा ही भावना भारतीय राष्ट्रवादाच्या मुळाषी होती. ब्रिटिषांच्या षिक्षणपद्धतीमुळे, ख्रिष्चन मिषनरी चळवळीमुळे आणि जगभरातील मानवतावादी तत्वज्ञानांच्या परिचयामुळे भारतात राष्ट्रभावना विकसित झाली. या भारतीय राष्ट्रभावनेच्या विकसनात ब्रिटिषांच्या प्रषासनातील व न्यायव्यवस्थेतील पक्षपात, अन्याय हे घटक विरोधी पाष्र्वभूमी म्हणून निर्णायक ठरले. भारतात राष्ट्रवाद स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, विष्णुषास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, मा. स. गोवळकर या मंडळींच्या धर्मनिष्ठ दिषेने आणि महात्मा जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, डाॅ. आंबेडकर यांच्या धर्मातीत दिषेने असा परस्पविरोधी दोन दिषांनी विकसित झाला आहे. तसेच राजा राममोहन राॅय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचा उदारमतवादी राष्ट्रवादाचा प्रवाह स्वतंत्र आहेच.

डाॅ. आंबेडकरांचे राष्ट्रचिंतन:
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाजव्यवस्थेच्या विषमतेचा भिषण अनुभव आला होता. तसेच त्यांना समाजव्यवस्थेच्या अंगोपांगाची सखोल जाणही होती. भारतीय इतिहास, समाजजीवन, संस्कृती, कला, विद्याक्षेत्रे या सर्वांचे सर्वस्पर्षी आकलन त्यांना होते. ब्रिटिषपूर्व भारतातील राष्ट्रभावनेचा अभाव त्यांच्या चिंतनषील मनाला छळत होताच. भारतीय राष्ट्रवादासंबंधी ‘राष्ट्रीयत्व म्हणजे जातभावनेचा अभाव’ असे साधे सूत्र त्यांनी मांडले. ‘‘जात, वर्ण, आणि संप्रदाय यांच्याषिवाय सामाजिक बंधुभाव प्रत्यक्षात आणणे आणि समाजात सुसंवाद निर्माण करणे म्हणजे राष्ट्रवाद’’ अषी डाॅ. आंबेडकरांची राष्ट्रवादविषयक संकल्पना होती. डाॅ. आंबेडकर वंष, जन्म, धर्म, संस्कृती, भाषा, श्रद्धाविषय, ह्या बाबींना राष्ट्रवादाचा मूलाधार मानत नाहीत. देषाच्या जनमनातील एकत्वाची भावना हे राष्ट्रवादाचे केंद्रक डाॅ. आंबेडकर मानतात.

                     डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवादाला भारतातील शूद्रातिषूद्र जनतेच्या शोषणमुक्तीचा संदर्भ होता. बहुसंख्य शोषित जनता शोषणमुक्तीषिवाय राष्ट्रजीवनाच्या प्रवाहात समरस होणार नाही हे सत्य ते ओळखून होते. भारतीयांच्या राजकीय स्वातंत्र्य चळवळीचे खुजेपण त्यांना ज्ञात होते. म्हणूनच त्यांनी सर्वंकष मानवमुक्तीचा ध्यास घेतला होता. त्यांना राष्ट्रवादातील धर्मसत्ता अमान्य होती. त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना धर्मातीत, धर्मविहीन, इहवादी (Secular) स्वरूपाची होती. आपण विषिष्ट जात, वर्ण, धर्म, वा वंषाचे म्हणून ‘एक राष्ट्र’ आहोत असे मानणे म्हणजे आत्मवंचना होय असे ते मानत. ‘‘शेकडो, हजारो जातींनी विभागलेले लोक एक राष्ट्र कसे होऊ शकतील?’’ असा डाॅ. आंबेडकरांचा धर्मनिष्ठ राष्ट्रवाद्यांना निर्णायक सवाल होता. डाॅ. आंबेडकरांनी जातिव्यवस्थेचे उच्चाटन ही राष्ट्रवादाची पहिली पायरी मानली होती.

                                         डाॅ. आंबेडकरांच्या राष्ट्रवादाला बुद्धिप्रामण्यावादाचे तत्वगंभीर अधिष्ठान लाभले होते. प्राचीन संस्कृती, इतिहास, परंपरा, धर्म, वंष इत्यादींच्या अतिरेकी, भाबड्या गौरवातून असहिष्णूतेचा, अविवेकाचा जन्म होतो. या एकारलेल्या, असहिष्णू राष्ट्रभावनेतून राष्ट्राचे अकल्याण होते असे त्यांचे मत होते. त्यांनी जुन्या, प्राचीन संचिताची आणि नव्या आधुनिक जीवनमूल्यांची बुद्धिवादी निकषांवर कठोर चिकित्सा केली. म्हणूनच सांस्कृतिक, पुनरूज्जीवनवादी राष्ट्रमीमांसा त्यांना अमान्य होती.

जोतीराव फुलेप्रणित राष्ट्रवादाचा वारसा:
भारतातील राष्ट्रवाद धर्मनिष्ठ आणि इहवादी (जात्यंतक) अषा दोन छावण्यांमध्ये विभागलेली आढळतो. यापैकी इहवादी राष्ट्रवादाची मांडणी सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुल्यांच्या विचारात आढळते. जोतीराव फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘‘…यावरून या बळीस्थानातील एकंदर शूद्रातिषूद्रासह, भिल्ल, कोळी वगैरे लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतो, सर्व सारखे एकमय लोक झाल्याषिवाय (नेषन) होऊ शकत नाही.’’ थोडक्यात ‘एकमय लोक’ म्हणजेच राष्ट्र अषी फुल्यांची धारणा होती. जोतीराव फुल्यांच्या निधर्मी राष्ट्रमीमांसेचे संपूर्ण विकसन पुढे डाॅ. आंबेडकरांच्या राष्ट्र चिंतनात झाले आहे. डाॅ. आंबेडकरांनी हे इहवादी राष्ट्रचिंतन अधिक व्यापक परिप्रक्ष्यात जगासमोर मांडले. ब्रिटिष साम्राज्यवाद, स्वातंत्र्याची चळवळ, जगभरातील फॅसिस्ट जाणिवा, जगभरातील उलथापालथ, भारतीय समाजमुक्तीचा लढा अषी सगळया जळत्या वास्तवाच्या पाष्र्वभूमीवर आंबेडकरांनी आपल्या विवेकनिष्ठ, मानवतावादी जननिष्ठ राष्ट्रवादाची उभारणी केली आहे.

राष्ट्रवादापुढील अवरोध:
डाॅ. आंबेडकरांनी राष्ट्रवादाच्या विवेचनासोबतच राष्ट्रवादापुढील अवरोधांचीही सूक्ष्म चिकित्सा केली आहे. जातीयता हा भारतीय राष्ट्रवादापुढील प्रमुख अवरोध आहे असे ते म्हणत. जातभावनेचा अभाव म्हणजेच राष्ट्रभावना असेही ते मानत. जातिविहिन समाजरचना देषात निर्माण झाली नाही तर राष्ट्रभावना धोक्यात येऊन आपले राष्ट्र जागतिक राष्ट्रप्रवाहापासून दूर फेकले जाईल असा धोक्याचा इषाराही त्यांनी दिला होता.

                               डाॅ. आंबेडरांना भारताच्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वास्तवाचे पूर्ण आकलन होते. विविध भाषाप्रवाहांनी निर्मिलेल्या राष्ट्रीय-सांस्कृतिक संचिताचे मोलही ते जाणून होते. परंतु विविध भाषिक-सांस्कृतिक अहंकारामुळे राष्ट्रीय ऐक्यभावनेला तडा जातो हे विपरित वास्तवही त्यांना अस्वस्थ करीत होते. म्हणूनच त्यांनी भाषिक एकतेचे प्रखरपणे समर्थन केले होते. आपल्या भाषिक अहंकारांनी माणूस तोडण्याचे काम केले. हे भाषिक अहंकारांनी माणूस तोडण्याचे काम केले. हे भाषिक अहंकार चीनच्या भिंतीसारखे आहेत असे ते म्हणत. म्हणूनच बहुभाषिकतेऐवजी ‘एक राष्ट्र: एक भाषा’ या तत्वाचे त्यांनी समर्थन केले. विविध स्थानिक भाषांच्या अस्तित्वासोबतच हिंदी ही राष्ट्राची भाषा झाली पाहिजे, अवघे राष्ट्र एका भाषेतून बोलले पाहिजे, असा भाषिक एकतेविषयी त्यांचा आग्रह होता. राष्ट्रकल्याण हाच त्यांच्या जीवितकार्याचा एकमेव ध्यास होता.
याषिवाय प्रांतवाद, धर्मवाद, आदिवासींची उपेक्षा आणि व्यक्तिपूजा ही राष्ट्रविरोधी अवरोधांचीही आंबेडकरांनी सविस्तर चिकित्सा केली. व्यक्तिपूजा ही स्वातंत्र्य, सामाजिक लोकषाही अन् पर्यायाने राष्ट्रालाही धोकादायक ठरते, व्यक्तिपूजा हा शेवटी पारतंत्र्याकडे नेणारा मार्ग आहे असे ते म्हणत.

                                    डाॅ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा विवेकषील, मानवतावादी, बुद्धिनिष्ठ अन् देषाचे इहवादी वास्तव स्वीकारणारा होता. त्यांनी अध्यात्माऐवजी सामाजिक नीतीला, धर्मनिष्ठेऐवजी विवेकषीलतेला, संप्रदाय-वंष-जन्म-संस्कृती या खुल्या घटकांऐवजी व्यापक मानवनिष्ठेला प्राध्यान्य देणारा धर्मविहिन इहवादी (Secular) राष्ट्रवाद मांडला. साम्राज्यवादाचा, सामाजिक विषमतेचा, फॅसिस्ट जाणिवांचा, भाषिक-सांस्कृतिक अहंकारांना आणि वंषश्रेष्ठतवाचा समग्र, समूळ नकारच आंबेडकरी राष्ट्रवादाच्या मुळाषी आहे. म्हणूनच आजच्या जागतिकीरणाच्या प्रक्रियेतही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रचिंतन संयुक्तिक अन् प्रेरणादायी ठरताना आढळते.
(‘धम्मराष्ट्राच्या दिषेने’ या आगामी वैचारिक लेखसंग्रहातून)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*